बारामती : मंत्र्यांप्रमाणे एस्कॉर्ट गाड्यांसह व्हीआयपी पोलीस सुरक्षा मिळवण्याच्या हव्यासापोटी बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांनी स्वतःवरच हल्ला घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांनी तपासातून या कटाचा पर्दाफाश केला आहे. या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
मंत्र्यांसारखी सुरक्षा मिळवण्यासाठी रचला कट!
राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने काही दिवसांपूर्वी बारामतीचे राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, या प्रकरणाच्या तपासातून हल्ल्यामागील वेगळेच कारण समोर आले. पोलिसांच्या तपासानुसार, सूर्यवंशी यांनी यापूर्वी पैसे भरून पोलीस संरक्षण घेतले होते. मात्र, त्यांना मंत्र्यांप्रमाणे वाहनांचा ताफा आणि एस्कॉर्ट गाड्यांसह व्हीआयपी दर्जाची सुरक्षा हवी होती. यासाठी स्वतःला धोका असल्याचे दाखवून सुरक्षा मिळवण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वतःवरील हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.
आरोपींच्या चौकशीत कटाचा उलगडा
या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात राणा सूर्यवंशी यांचे चालक लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी (वय ४२, रा. सणसर, ता. इंदापूर) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी पार्थ अवथडे आणि स्वप्नील कांबळे यांना अटक केली, तर एका अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेतले. शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
VIP सुरक्षेच्या हव्यासाची जिल्हाभर चर्चा!
स्वतःवरच हल्ला घडवून आणून मंत्र्यांप्रमाणे पोलीस सुरक्षा मिळवण्याचा प्रकार उघड झाल्याने बारामतीत एकच चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात पुढे कोणते खुलासे होतात आणि उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्याविरोधात पोलीस कायदेशीर कारवाई कशी करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0 Comments